ग्रामपंचायत विभाग
परिचय
ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेमधील विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामपंचायत विभाग अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियान (स्वच्छ भारत मिशन) या महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सामाजिक), ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक संवर्गाच्या आस्थापना देखील विभागामार्फत सांभाळल्या जातात.
ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्त संस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्र शासनाने ७३ वी घटना दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनुसार ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतींची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरू आहे.
देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनांचा लाभ तळागाळातील माणसाला मिळावा व त्यांची उन्नती/प्रगती व्हावी यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत.
दृष्टी आणि ध्येय
- ग्रामपंचायती स्वायत्त आणि सक्षम बनविणे.
- गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत योजना राबविणे.
- पारदर्शक व उत्तरदायित्व असलेले प्रशासन.
- नागरिकांना दारापर्यंत सेवा पुरविणे.
उद्दिष्टे व कार्ये
- ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी निधीचे व्यवस्थापन.
- ग्रामसभा व ग्रामपंचायत कामकाजाचे नियोजन व अंमलबजावणी.
- पंचायत समित्यांमार्फत विविध योजना राबविणे.
- सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन.
- विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या आस्थापना व प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी.